शिक्षण सप्ताह – मूलभूत संख्याज्ञान व पायाभूत साक्षरता दिवस
महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि.२२ जुलै ते २८ जुलै पर्यंत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांनी निर्दिष्ट केलेल्या कार्यक्रमानुसार आज २३ जुलै हा दुसरा दिवस *मूलभूत संख्याज्ञान व पायाभूत साक्षरता दिवस* म्हणून साजरा करण्यात आला.
पार्ले टिळक विद्यालय माध्यमिक विभाग मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पाचवी ते नववी या वर्गांमध्ये निरनिराळ्या उपक्रमांचे व कृती कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्यात आला. यात इयत्ता पाचवीच्या वर्गांमध्ये त्रिमितीय आकृत्यांचे ठोकळे वापरून वस्तूंच्या कडा,बाजू व शिरोबिंदू मोजण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.यासाठी घन,इष्टिकाचिती, त्रिकोणी चिती, शंकू इत्यादी प्रतिकृतींचा वापर करण्यात आला.सहावीच्या वर्गांमधून पाढे लेखन तसेच संख्याज्ञान, समसंख्या,विषम संख्या यांचे लेखन करून घेण्यात आले. अपूर्णांकांच्या रंगीत ठोकळ्यांमधून अपूर्णांकांच्या संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या. वर्तुळाकृती ठोकळ्यांच्या चौकटीचा वापर करून धनसंख्या व ऋणसंख्या या संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या.इयत्ता सातवीच्या वर्गांमधून मनोरंजनातून गणित शिकवताना घड्याळ तसेच विविध वर्तुळाकृती ठोकळे वापरून विविध संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या. इयत्ता आठवीच्या वर्गात मापे लिहिलेले ठोकळे व चाकाची पट्टी वापरून क्षेत्रफळ व परिमिती काढणे या कृती करून घेण्यात आल्या. इयत्ता नववीच्या वर्गांमधून भौमितिक आकार वापरून रांगोळ्या काढण्यात आल्या तसेच भूमितीय आकारांचा उपयोग करून चित्रे काढण्यात आली. जसे – फुलपाखरू, गणपती इ.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयातील सर्व शिक्षकांनी निपुण भारत कार्यक्रमासाठी निर्धारित केलेली *प्रतिज्ञा उद्धृत केली.* अशा रीतीने विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात, विविध कृतीकार्यक्रमांच्या आयोजनाने आजचा मूलभूत संख्याज्ञान व पायाभूत साक्षरता दिवस साजरा झाला.








