९ ऑगस्ट ‘क्रांती दिनानिमित्त’ पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेमध्ये क्रांतिकारकांना अनोखी मानवंदना’
‘विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्पर्धेतून सादर केले क्रांतिकारकांचे प्रेरणादायी जीवन’
कशास आई भिजवीसी डोळे उजळ तुझे भाल,
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल,
सरणावरती आज आमची पेटतात प्रेते,
उठतील त्या ज्वाळातून भावी क्रांतीचे नेते.
- भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील क्रांती दिनाचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘क्रांतिकारकांची वेशभूषा’ स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान अभिनयातून सादर करण्याची संधी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर, विद्यार्थ्यांनी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक अशा अनेक क्रांतिकारकांची वेशभूषा धारण करून त्यांच्या कार्याची माहिती दिली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या व्यक्तिमत्वातून त्या क्रांतिकारकाचा त्याग आणि देशभक्ती प्रभावीपणे मांडली.
यावेळी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. तरकरबाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, “आजच्या पिढीने आपल्या क्रांतिकारकांचा इतिहास समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी प्रत्येकाने देशाप्रती आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे.”
या कार्यक्रमात उत्कृष्ट वेशभूषा सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली. तसेच, त्यांना देशाच्या इतिहासाची आणि त्यागाची जाणीव झाली. या यशस्वी आयोजनाबद्दल पालक आणि शिक्षकांनी शाळेचे कौतुक केले.















