0226118004 (माध्यमिक )

मुख्याध्यापक

मुख्याध्यापक

लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर पार्ल्यातील काही रहिवाशांनी टिळकांचे शैक्षणिक स्मारक निर्माण करण्याच्या हेतूने ‘पार्ले टिळक विदयालय’ ही संस्था १९२१ साली स्थापन केली. गेल्या ९८ वर्षांत या रोपट्याचा महावटवृक्षाप्रमाणे विस्तार झाला. त्याची एक शाखा म्हणजेच पार्ले टिळक विदयालय – माध्यमिक शाळा (मराठी माध्यम) होय.

विदयालयाच्या सुरुवातीपासून श्री. पिंगळे, श्री. आगाशे, श्रीमती मराठे, श्री. पेंढारकर, श्री. कुलकर्णी, श्री. सहस्रबुद्धे, श्रीमती वाटवे, श्रीमती देव, श्रीमती करंडे, श्रीमती वाडेकर अशा दिग्गज शिक्षकांनी मुख्याध्यापक पद भूषविले. शैक्षणिक विकासाबरोबरच इतर सर्व क्षेत्रांत निरनिराळे प्रयोग करून प्रथितयश शाळेचा पाया भक्कम केला. शाळेची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात उंचावली.

अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा, विज्ञान अशा सर्व क्षेत्रांत विदयार्थी तरबेज व्हावेत म्हणून अनेकविध उपक्रमांचा पाया घालून एक आदर्श शाळा अशी प्रतिमा निर्माण केली. कै. नी.र.सहस्रबुद्धे यांना शासनाने राज्यपुरस्कार तर श्रीमती वाटवे यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विदयालयात विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. इ. ५ वी पासून सेमी इंग्लिशचे वर्ग घेतले जातात. विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विदयार्थी सहभागी होतात. विविध क्रीडास्पर्धांमध्येही विदयार्थी सहभागी होतात. काही विदयार्थ्यांनी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल यश मिळविले आहे. शाळा सुटल्यानंतर दररोज विदयार्थ्यांसाठी विविध खेळांची शिबिरे विनामूल्य घेतली जातात. अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांसाठी खास अध्यापन वर्ग घेतले जातात. शिष्यवृत्ती, बाल वैज्ञानिक, एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला वर्ग, एम.टी.एस. व एन.एम.एम.एस. वर्ग अशा स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते, विशेष अध्यापन वर्ग घेतले जातात. विदयालयाची स्वतःची व्यायामशाळा असून त्याठिकाणी विनामूल्य शिक्षण दिले जाते.

शाळेत व्यावसायिक समुपदेशक (ऑक्युपेशनल थेरेपिस्ट) आहेत. त्यांच्या मदतीने लेखनात कमी गती असणाऱ्याविदयार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्याचप्रमाणे समुपदेशक आहेत. त्यांच्या मदतीनेही अभ्यासात कमी असणाऱ्या विदयार्थ्यांना, विशेष समस्या असणाऱ्या विदयार्थ्याना योग्य ते मार्गदर्शन केले जाते. शाळेत सुसज्ज असे ग्रंथालय आहे. त्याचप्रमाणे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगाला पूरक अशी A.V. Room आहे. वक्तृत्त्व, निबंध, संगीत, नाट्य, पाठांतर, विज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धांमध्ये विदयार्थ्यांना सहभागी केले जाते, त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.

कार्यानुभव विषयांतर्गत संगणक, तंत्रशिक्षण हे व्यवसायाभिमुख वर्ग चालवले जातात. राष्ट्रप्रेम, शिस्त यासाठी N.C.C., M.C.C. हे अभ्यासक्रम घेतले जातात. आज विदयालयाचे N.C.C. पथक मानबिंदू ठरले आहे.

विदयालयात विदयार्थी मंडळ, विज्ञान मंडळ, निसर्ग मंडळ, क्रीडा मंडळ कार्यरत आहेत. शाळेच्या निसर्ग मंडळातर्फे शाळेच्या एका कोपऱ्यात सुरेख अशी बाग तयार केलेली आहे. या बागेत विविध फुलझाडे, औषधी वनस्पती, शोभेच्या वनस्पती आहेत. या बागेत छोट्या स्वरूपात शेतीही केली जाते.

अशा प्रकारे विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा नेहेमीच झटत असते. त्यामुळेच आज भारतात आणि परदेशातही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये शाळेचे विदयार्थी चमकताना दिसतात. त्यामुळेच जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असलेला विदयार्थी जेव्हा म्हणतो, ‘मी पार्ले टिळक विदयालयाचा विदयार्थी आहे’ तेव्हा आम्हां शिक्षकांचाही ऊर भरून येतो, आकाश ठेंगणे वाटते.

विदयालयाची स्थापना करताना संस्थापकांनी विदयार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास करण्याचे जे ध्येय डोळ्यांपुढे ठेवले होते तेच अबाधितपणे, अखंडपणे साध्य करण्याचा प्रयत्न आजही केला जात आहे.

मुख्याध्यापिका – श्रीमती लतिका नी. ठाकूर 

                                                                                                      * * *

 

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow